कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कराचीत निर्बंध   

कराची : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या हल्ल्याला पाच दिवस उलटूनही पाकिस्तानला मोठा हल्ला होण्याची भीती आहे. ही भीती त्यांच्या कृतीतूनही दिसत आहे. दरम्यान, पाकिस्तानातील कराचीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
 
पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कराचीचे आयुक्त सय्यद हसन नकवी यांच्या आदेशानुसार, एसआयटीइ क्षेत्र आणि केमारी जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. परिसरातील कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखणे हा या मागील उद्देश आहे. २४ जूनपर्यंत हे नियम लागू राहणार आहे.
 
कराचीचे आयुक्त सय्यद हसन नक्वी यांनी या परिसरात जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात कलम १४४ लागू केले आहे. या अंतर्गत जड वाहने आणि मालमोटार यांना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा नियम १७ एप्रिल ते १६ जून २०२५ या कालावधीत लागू असेल. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिले आहेत. पाकिस्तान दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवरही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. कराचीला पाकिस्तानची आर्थिक राजधानी समजली जाते. येथून संपूर्ण देशाचे नियंत्रण केले जाते.

सातत्याने बैठका सुरू 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार दररोज २ ते ३ बैठका घेत आहेत. सभा घेण्यासाठी त्यांनी बांगलादेशचा दौराही रद्द केला आहे. दुसरीकडे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हेही वेगवेगळ्या बैठकांमध्ये व्यस्त आहेत. 

अमेरिका, इराणकडे हस्तक्षेपाची मागणी

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो म्हणाले, भारत आमच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत नाही. आम्ही संदेश पाठवत आहोत, पण भारताकडून कोणताच येत प्रतिसाद नाही. पाकिस्तानने अमेरिका आणि इराणसारख्या देशांकडूनही थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. भारताने हे अमान्य केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे भुट्टो म्हणाले.
 

Related Articles